क्रांतिदिनानिमित्त महापालिका, संस्था-संघटनांच्या वतीने थोर क्रांतिकारकांना वंदन
पिंपरी, ता. १० ऑगस्ट २०२६ - क्रांतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि विविध संस्था-संघटनाकडून, शाळांमध्ये स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले.
चिंचवड येथील हुतात्मा चापेकर बंधूंचे समूहशिल्प, चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समितीचे सभापती संजय काटे, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, नगरसदस्य राजू बनसोडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, स्वाती काटे, प्रतीक्षा जवळकर आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसतर्फे ‘इतिहास स्वातंत्र्य चळवळीचा, कथा क्रांतीच्या’ या विषयावर व्याख्याते डॉ. दिलीप गरुड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी गरुड यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांच्या कथा व वीरगाथा सांगत उपस्थितांना प्रेरित केले. शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी आजच्या राजकीय परिस्थितीत संविधान आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी पुन्हा लढा उभारण्याची गरज व्यक्त केली. गांधीवादी विचारवंत बी. आर. माडगूळकर, अभिमन्यू दहीतुले, पांडुरंग जगताप, धनाजी येळकर पाटील, प्रवीण कदम आदी उपस्थित होते.