शहराच्या सर्वांगिण विकासासाठी महापालिका राबवणार ‘घरोघरी महापौर’ अभियान
पिंपरी, ता. ४ - शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘घरोघरी महापौर’अभियान राबविण्यात येत आहे. “तुमचा अभिप्राय – आपल्या शहराच्या विकासाचा पाया!” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाद्वारे नागरिकांचा आवाज थेट महापौर रवी लांडगे यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांबाबत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत केवळ ५ सोप्या प्रश्नांच्या माध्यमातून नागरिकांचा अभिप्राय नोंदविण्यात येणार आहे. या अभिप्रायाच्या आधारे शहराच्या विकासात्मक निर्णय प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे.
नागरिकांकडून मिळणारा अभिप्राय हा शहराच्या नियोजनात आणि सेवा सुधारण्यात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सेवांबाबत थेट नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यामुळे प्रशासनाला प्राधान्यक्रम निश्चित करण्यात मदत होणार आहे. त्यामुळे अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख निर्णय घेण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होणार असून पारदर्शकतेलाही चालना मिळणार आहे.
शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे....
''पिंपरी चिंचवड शहराचा खरा विकास नागरिकांच्या सहभागातूनच शक्य आहे. ‘घरोघरी महापौर’ अभियानाद्वारे आम्ही प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकण्याचा आणि त्यानुसार शहरातील विकासाला आणखी गती देण्याचा प्रयत्न करत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसराच्या आणि शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे.'' - महापौर रवी लांडगे