आयशर ट्रक व दुचाकीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, ट्रक चालकावर गुन्हा दाखल
May 26 2026
16
आयशर ट्रक व दुचाकीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, ट्रक चालकावर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २७ - नाशिक–पुणे महामार्गावर कुरुळी (ता. खेड) येथील चिंबळी फाटा परिसरात भरधाव आयशर वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून आयशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात २५ मे रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी २६ मे रोजी ट्रक चालकाविरोधात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी रितेश वैकुंठराव भगत (वय २१, सध्या रा. साने चौक, चिखली; मूळ रा. ता. आष्टी, जि. वर्धा) यांनी तक्रार दिली आहे. भगत त्यांचा मावस भाऊ शिल्केश प्रल्हाद काळपांडे आणि मित्र रुपेश दिगंबर भरकक्षे यांच्यासह पल्सर दुचाकीवरुन मोशीच्या दिशेने जात होते. चिंबळी फाटा येथे मोई गावाकडे जाणाऱ्या वळणाजवळ समोरुन येणाऱ्या आयशर ट्रकच्या चालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगात वाहन चालवत अचानक डावीकडे घेत ब्रेक लावल्याने दुचाकी मागून धडकली. या अपघातात दुचाकीवरील शिल्केश काळपांडे आणि रुपेश भरकक्षे हे दोघे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातामुळे पल्सर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. आरोपी आयशर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.