हजारो भाविकांनी अनुभवला संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा
पिंपरी, ता. ६ - श्री क्षेत्र देहूमध्ये इंद्रायणी नदी तीरावर संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा बीज सोहळा गुरुवारी (ता. ५) तुकोबारायांच्या नामघोषात पार पडला. वैकुंठगमन सोहळ्याची वेळ जवळ येताच दुपारी साडेबारा वाजता भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. हजारो भाविकांनी हा सोहळा मनात साठवला.
गुरुवारी (ता. ५) सकाळी संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाड्यात पहाटे तीन वाजता काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सपत्नीक विठ्ठलरखुमाईची महापूजा केली. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. पहाटे साडेपाच वाजता सदेह वैकुंठ गमनस्थान मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची महापूजा विश्वस्त उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.
संत तुकाराम महाराज यांच्या पादुका सकाळी दहा वाजता शेजघरातून मुख्य विठ्ठलरखुमाई मंदिरात आणण्यात आल्या. पाद्यपूजेनंतर भजनी मंडपात फुलांनी सजवलेल्या पालखीत या पादुका ठेवण्यात आल्या. भक्तांच्या मांदियाळीत पालखीने वैकुंठगमनस्थान मंदिराकडे प्रस्थान ठेवले. पालखीपुढे सनई-चौघडे, ताशे, नगारे, अब्दागिरी आणि टाळकरी होते. पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती. रस्त्यावर दुतर्फा भाविक दर्शनाठी उभे होते. यानंतर वैकुंठ गमनस्थान मंदिरासमोर संस्थानचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ कीर्तनकार बापूसाहेब महाराज मोरे यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यावरील अभंगावर कीर्तन झाले.
दुपारी साडेबाराला भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. वैकुंठ गमनस्थान मंदिरात संस्थानचे विश्वस्त गणेश महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, अपर तहसीलदार जयराज देशमुख, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे व अधिकारी उपस्थित होते.