पिंपरी-चिंचवड | २६ नोव्हेंबर २०२६ : सकाळी साडेसहा वाजता टाळ-मृदंगाचा गजर सुरू झाला आणि भाविकांनी भंडारा डोंगराच्या पायवाटेने परिक्रमेला सुरुवात केली. सहा वर्षांच्या मुलांपासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील भाविकांनी सुमारे साडेपाच किलोमीटरचे अंतर पायी पार केले. तीर्थक्षेत्र श्री भंडारा डोंगर परिक्रमा समितीने आयोजित केलेल्या या पहिल्या परिक्रमेत १,३०० हून अधिक भाविक सहभागी झाले, अशी माहिती आयोजकांनी दिली.
परिक्रमेपूर्वी तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील आणि परिसरातील संत-महंत व वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर परिक्रमेचा मार्ग दाखवणाऱ्या फलकाचे अनावरण झाले. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि आसपासच्या भागांतून आलेल्या भाविकांनी हरिनामाचा गजर करत जंगलातील पायवाटेने परिक्रमा केली.
सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिका, नियोजनासाठी स्वयंसेवक
‘आरोग्यातून अध्यात्म आणि अध्यात्मातून आरोग्य’ हा परिक्रमेचा मुख्य संदेश होता. वाटेत प्राथमिक उपचारांची गरज भासल्यास मदत मिळावी, यासाठी आयोजकांनी रुग्णवाहिका ठेवली होती. सुमारे ४० ते ५० स्वयंसेवकांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर भाविकांना उसळीचा अल्पोपहार देण्यात आला. सकाळी दहा वाजता उपक्रमाचा समारोप झाला.
परिक्रमेला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्याचाही संकल्प यावेळी करण्यात आला. देशी झाडांची लागवड आणि जतन, तसेच जलसंवर्धन यासाठी पुढाकार घेण्याचा मनोदय आयोजकांनी व्यक्त केला. भविष्यात दुष्काळग्रस्त भागांना मदत करण्याच्या कल्पनेलाही उपस्थित भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समितीने सांगितले.
पुढील परिक्रमा २७ डिसेंबरला
यापुढे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी भंडारा डोंगराची परिक्रमा आयोजित केली जाणार आहे. पुढील परिक्रमा रविवार, २७ डिसेंबर २०२६ रोजी होणार असल्याचे समितीने जाहीर केले.