उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना १००० रोपांचे मोफत वाटप........ आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागरमध्ये उपक्रम
उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना १००० रोपांचे मोफत वाटप
आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागरमध्ये उपक्रम
पिंपरी, ता. ६ - आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.
आमदार जगताप वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी काहीतरी सकारात्मक व शाश्वत योगदान देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून “एक व्यक्ती – एक वृक्ष” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आली. वाढत्या नागरीकरणामुळे कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, “आमदार शंकर भाऊ जगताप हे केवळ लोकप्रतिनिधी नसून जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने झटणारे कार्यसम्राट आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत समाजहिताला नेहमीच प्राधान्य असते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्ष वाटपासारखा उपक्रम राबवून त्यांच्या कार्याला साजेसा आणि समाजासाठी उपयुक्त संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आज लावलेला प्रत्येक वृक्ष हा भविष्यातील पर्यावरणाचा मजबूत पाया ठरेल.”
तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदा संजय भिसे म्हणाल्या, “आमदार शंकर जगताप यांची काम करण्याची धडाडी, जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टी ही खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. शहराचा विकास करताना पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे, आणि अशा उपक्रमांमधून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
या उपक्रमाद्वारे आमदार शंकर जगताप यांना ‘निसर्ग आरोग्यदायी शुभेच्छा’ देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक स्वरुपात समाजात पोहोचविण्यात आला. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी उन्नती फाउंडेशन सभासद, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघ, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय, यांच्यासह पिंपळे सौदागर , रहाटणी मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.