श्री नागेश्वर महाराज उत्सवामध्ये विजय सस्ते यांनी २५ लाखांना घेतला मानाचा विडा
पिंपरी, ता. १८ - मोशी येथे झालेल्या श्री नागेश्वर महाराज उत्सवामध्ये मानाच्या विड्याचा लिलाव करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार मंगळवारी (ता. १७) हा मानाचा विडा भाविक विजय पांडुरंग सस्ते यांनी २५ लाखांना घेतला. सन्मानपूर्वक विडा स्विकारल्यानंतर सस्ते यांनी श्री नागेश्वर महाराजांना वंदन केले.
यंदा या मानाच्या विड्याच्या परंपरागत लिलावात विड्याची बोली २५ लाख रुपयांपर्यंत पोचली. १ लाख रुपयांपासून लिलावाची सुरवात झाली होती. तिसरा व शेवटचा पुकार झाल्यानंतर मानाचा विडा २५ लाख रुपयांना गेल्याची घोषणा झाली. महाशिवरात्रीपासून श्री नागेश्वर महाराजांच्या उत्सवाचा प्रारंभ झाला होता. शुक्रवारी (ता. १७) परंपरागत लिलावाने उत्सवाची सांगता झाली.
लिलावात मानाची ओटी आकाश विष्णू सस्ते यांनी १७ लाख ११ हजार १०१ रुपये, शेवटचे लिंबू स्वप्नील दत्तात्रेय सासवडे यांनी १० लाख ११ हजार १०१ रुपये बोली देऊन घेतले. पहिले लिंबू संभाजी बबन बोऱ्हाडे यांनी २ लाख ११ हजार रुपये बोलीत चेतले. मानाचा पहिला विडा दोन लाख रुपयांना गेला.
या लिलावाचे नियोजन व संचालन करण्याचा मान केदारी कुटुंबाकडे असून, केदारी परिवाराच्या वतीने संपूर्ण लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली. उत्सवात वापरलेल्या व महाराजांच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंच्या लिलावातून यंदा एकूण दीड कोटी रुपये प्राप्त झाले अशी माहिती देण्यात आली.
उत्सवानिमित्त भाविकांसाठी अभिषेक, महापूजा, हरिपाठ, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. वातावरण मंगलमय झाले होते.