वाकडमध्ये दिवाळी संध्या २०२६; राहुल देशपांडे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

वाकडमध्ये दिवाळी संध्या २०२६; राहुल देशपांडे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

वाकड | १० नोव्हेंबर २०२६ : दिवाळीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात संगीत, संस्कृती आणि सामाजिक स्नेहबंधांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. भाजपचे नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांच्या पुढाकाराने वाकड येथील कमल प्रतिष्ठान माउंट लिटेरा स्कूल येथे आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ हा सांगीतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरसेवक राहुल कलाटे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेणे, त्यांना दर्जेदार संगीताचा आनंद देणे आणि सामाजिक स्नेहबंध अधिक दृढ करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते राहुल देशपांडे यांचे गायन. भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा आपल्या गायनातून रसिकांसमोर सादर करणाऱ्या राहुल देशपांडे यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सुरेल सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. दिवाळीच्या उत्सवी वातावरणात रंगलेल्या या संगीत मैफलीने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे, विश्वास मोरे, अविनाश चिलेकर, सुनील लांडगे, वसंत कलाटे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सुलभाताई उबाळे, भाजप शहर सरचिटणीस मधुकर बच्चे, पृथ्वीराज साठे, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, चेतन भुजबळ, संजय काटे, काळूराम बारणे, सुरेंद्र भोईर, कुशाग्र कदम, अमित गावडे, अनंत कोऱ्हाळे, प्रमोद कुटे, राजेंद्र तरस, निलेश तरस, बापू कातळे, विराज लांडे, सचिन सानप, निलेश बोराडे, निलेश बारणे आणि महेश बारणे उपस्थित होते.

तसेच माजी महापौर नितीन आप्पा काळजे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, सचिन चिखले, गणेश भोंडवे, धनंजय आल्हाट, राजेंद्र गावडे, राजेंद्र करपे, विशाल अप्पा कलाटे, हेमंत डांगे, हरेश नखाते, दिनेश नडे आणि अजिंक्य स्वामी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक राहुल तानाजी कलाटे म्हणाले, "वाकडमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ या विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाचा आनंद नागरिकांना एकत्रितपणे घेता यावा, हा यामागील मुख्य हेतू होता. आपल्या समृद्ध भारतीय संगीतपरंपरेचा अभिमान जपत समाजातील प्रत्येक घटकाला आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, हीच माझी भावना आहे."

कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्व मान्यवर, नागरिक आणि रसिकांचे आभार मानले. ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ या कार्यक्रमामुळे वाकड परिसरातील दिवाळीच्या उत्सवाला सुरेल संगीताची आणि सामाजिक एकोप्याची जोड मिळाली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories