पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर महापौर रवी लांडगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा
पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर महापौर रवी लांडगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा
पिंपरी, ता. ५ ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी मंगळवारी (ता. ४) मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींची तातडीने संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली. तसेच शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी नवीन प्रकल्प उभारणीसाठी शासनाचे मार्गदर्शन आणि सर्वतोपरी सहकार्य मिळावे, अशी मागणी केली.
यासोबतच ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजय जगताप यांनी लिहिलेल्या 'आपलं पिंपरी-चिंचवड शहर' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी वेळ देण्याची विनंती केली.
याबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये राबवत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही त्यांना दिली. प्रत्येक महापालिका शाळेत ‘वारे गुरुजी पॅटर्न’ प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प आणि ‘अक्षर विश्व ज्ञानसंकुल’ या माध्यमातून पिंपरी-चिंचवडला ज्ञानाची नगरी बनविण्याचे स्वप्न याविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विषय सकारात्मकपणे ऐकून घेत शहराच्या विकासासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.