चिखलीतील लॉजवर पोलिसांचा छापा, वेश्याव्यवसायास बळी पडलेल्या ९ महिलांची सुटका
शहर पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई
पिंपरी, ता. १६ - चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत लक्ष्मी चौक परिसरातील आदित्य लॉजवर १३ एप्रिला मध्यरात्री छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी वापर करण्यात येणाऱ्या एकूण ९ पिडीत महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. त्यातील एका महिलेला आरोपींनी तस्करी करुन बांग्लादेशातून आणले होते. पोलीसांनी तिची सुटका केली असून तिच्या मायदेशी परत पाठवण्यासाठी प्रकिया सुरु केली आहे.
या प्रकरणी लॉज चालक सुदर्शन पवार (रा. मुबंई) जागा मालक नाना बोराटे (रा. पुणे), लॉज मॅनेजर अशोक बाबर (रा. चिखली) व साहील ऊर्फ शाहीन शिराजुल मंडल (रा. पश्चिम बंगाल), लॉज कामगार अकिबुल मुल्ला (वय २२ वर्षे, रा. आदित्य लॉज, लक्ष्मी चौक, चिखली) यांच्यावर चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (३), ६१ (२) सह पिटा कलम ३,४,५,७ प्रमाणे गुन्हा दाखल केल आहे. लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर व लॉज कामगार अकिबुल खालेक मुल्ला यास अटक करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत रहिवाशी हॉटेल व मसाज पार्लर / स्पा च्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध वेश्याव्यवसाया विरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करणे बाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार व सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते व दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास राउत, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली शेंडगे यांनी ही कारवाई केली आहे.
सन २०२६ मध्ये अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकुण ११ आस्थापनांवर छापे टाकुन भारतीय न्याय संहिता सह पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यात एकुण ७ मसाज पार्लर/स्पा, ४ हॉटेल या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ११ गुन्हयांमध्ये एकुण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असुन २८ पिडीत महिलांची सुटका करण्यात आलेली आहे. सदरची धडक कारवाई भविष्यात देखील अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.