वाहनचोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड, १३ मोटारसायकल जप्त
उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन तपास पथकाची
पिंपरी, ता. ६ - सातत्यपूर्ण गस्त आणि सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करुन उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गजाआड केले आहे. आरोपींकडून ५ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या १३ मोटार सायकल जप्त केल्या आहेत व पुढील तपास सुरु आहे.
अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली व पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ श्वेता खेडकर यांनी मोटार सायकल चोरीच्या ठिकाणांचे क्राईम मॅपिंग करणे, अचानक नाकाबंदी करुन कागदपत्र तपासणे, सतर्क पेट्रोलिंग करणे, वाहन चोरीच्या घटना घडलेल्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाचे आधारे गुन्हयाची उकल करणे याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षत कल्याण घाडगे व अंमलदार यांनी महाळुंगे औद्योगिक परिसरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करुन तसेच घटना घडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यांनुसार घटनास्थळी आरोपी आलेल्या व गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजव्दारे सातत्यपूर्ण व बारकाईने तपास केला असता नमूद गुन्ह्यातील मोटार सायकल चोरणारा इसम हा आंबेठाण चौक (चाकण) येथे राहणारा असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार शुभम खंडागळे यांना मिळाली. अधिकारी घाडगे व अंमलदार यांनी तत्परतेने सदर इसमास ताब्यात घेतले. चौकशीत मोटारसायकल चोरणाऱ्या इसमाचे नाव निलेश राजू मंडलीक (वय २४ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले. त्याने चाकण एमआयडीसी व आसपासच्या परिसरातून एकूण १३ मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्याने व त्याचा साथीदार संदिप साहेबराव सोनवणे (वय २५ वर्षे, रा. ता. कर्जत, जि. आहिल्यानगर) यांनी त्या मोटार सायकली विक्री केल्या असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या ५ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या एकुण १३ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग अव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ - ४ श्वेता खेडकर, सहा पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, साहिल सांडभोर, परिमंडळ ३ कडील सहाय्यक फौजदार राजू जाधव यांनी केली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------