*महापालिकेच्या खोदकामात* *सावली देणारं झाड भुईसपाट!*
मेट्रो स्टेशन चौकातून पिंपरीकडं जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाडपडी झाली. आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एक जण जखमी झाला, तर दोन चारचाकी वाहनांचं नुकसान झालं. सुदैवानं मोठा अनर्थ टळला.
मोरवाडी चौकानजीक नेपाळी मार्केट समोर गेली काही दिवसांपासून महापालिकेकडून खोदकाम सुरू आहे मात्र या कामाची माहिती दर्शवणारा एकही सूचनावजा फलक या परिसरात लावण्यात आलेला नाही. ज्या ठिकाणी हे खोदकाम सुरू आहे तिथं अनेक वर्षांपासून सावली देणारी पुष्कळ झाडं आहेत. या खोदकामा दरम्यान एका झाडाच्या मुळांना धक्का लागल्यानं एक भलं मोठं झाड थेट रस्त्यावर येऊन कोसळलं आणि त्याच्याखाली पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर आदळलं. यात दोन चारचाकी वाहनांचं नुकसान झालं तर हे झाड एका व्यक्तीच्या हाताला घासून गेलं. या घटनेत ती व्यक्ती जखमी झाली. या झाडाच्या फांद्या पिंपरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडल्यानं काही काळ वाहतूककोंडी झाली.
यानंतर काही वेळानं महापालिकेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि हे झाड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.
या घटनेत सुदैवानं मोठा अनर्थ टळला असला तरी या अशा अचानक घडणाऱ्या घटनांची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांकडून करण्यात आला शिवाय अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिकेनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही PCMC News चॅनेलशी बोलताना व्यक्त केली.