बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव सेवा सप्ताह; पुणे-बीडमध्ये विविध उपक्रम

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव सेवा सप्ताह; पुणे-बीडमध्ये विविध उपक्रम

पुणे | ११ नोव्हेंबर २०२६ : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान राज्यात ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत आदिवासी समाजापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि जनजागृतीविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना ‘धरती आबा’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

पुणे जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीने सेवा सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, स्मारक स्वच्छता, दीपोत्सव, रानभाजी महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी मेळावे, आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे आणि आधारकार्डसह इतर शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात १ हजार ९६७ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी भूमिहीन ८६३ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, आंबेगाव, भोर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर आणि राजगड या सात तालुक्यांतील आणखी ६४० लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यातील कातकरी समाजातील नागरिकांना १४ हजार ४४१ आधारकार्ड, १३ हजार ४८६ जातीचे दाखले आणि ११ हजार १७० रेशनकार्ड वितरित करण्यात आले आहेत. तसेच ४ हजार २०० नागरिकांना आयुष्मान कार्ड, ९७१ नागरिकांना जनधन बँक खाते आणि ४८५ नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातही ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १५ नोव्हेंबर रोजी वडवणी तालुक्यातील कुप्पा आणि खलवट निमगाव येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कार्यक्रम होणार आहेत. शिरूर कासार येथे शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिर, तर वडवणी आणि आष्टी-पाटोदा परिसरातील आदिवासीबहुल गावांमध्ये आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही विविध निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. पवित्र पोर्टलद्वारे २ हजार ५०० हून अधिक शिक्षकांची भरती करण्यात आली असून, ३ हजारांहून अधिक कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी सेमी-इंग्रजी व सीबीएसई पॅटर्न, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे आणि आश्रमशाळांमध्ये परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेच्या भत्त्यात ३३ टक्के वाढ करण्यात आली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘वीर राघोजी भांगरे’ शिष्यवृत्ती, महिलांसाठी ‘राणी दुर्गावती योजना’ आणि युवकांसाठी ‘विशेष उद्योजकता विकास योजना’ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories