news
clock
दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवरील सीसीटिव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश

दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवरील सीसीटिव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश

दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवरील सीसीटिव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश

पिंपरी, ता. २१ - राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेच्या ठिकाणी सीसीटिव्ही बंधनकारक केले आहेत.  परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्र परिसरातील, वर्गखोल्या, माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान संगणक प्रयोगशाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण जतन करून ठेवणे केंद्र व्यवस्थापनाला अनिवार्य आहे, याबाबतच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी विभागीय मंडळांच्या सचिवांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

मंडळाने दिलेल्या सूचनांमध्ये सांगितले आहे की, परीक्षा सुरु होण्यापूर्वी परीक्षा कक्षातील कॅमेऱ्यांचे किमान ३० मिनिटे आणि परीक्षा संपल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहणार आहे. केंद्रावरील डीव्हीआर/एनव्हीआरमधील प्रत्येक पेपर दिवशीचे रेकॉर्डिंग स्वतंत्र पेनड्राइव्ह /संगणकावर जतन करून ठेवणे, फुटेज साईज अधिक असल्यास हार्डडिस्कमध्ये ते जतन करून ठेवावे, रेकॉर्डिंग जतन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान शिक्षक किंवा तंत्रस्नेही शिक्षकाची मदत घ्यावी. केंद्रांवरील सर्व पेपरच्या दिवशीच्या मूळ चित्रीकरणात कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, हे चित्रीकरण पेनड्राइव्ह किंवा संगणकावर संग्रहित करावे आणि आवश्यकतेनुसार चित्रीकरण पुढील आदेश येईपर्यंत जतन करून ठेवावे. विभागीय मंडळ किंवा दक्षता समितीने मागणी केल्यास ते तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.

परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्र परिसरातील, वर्गखोल्यांमधील सीसीटीव्ही बंद असणे, चित्रीकरण जतन करून न ठेवणे अथवा उपलब्ध करून न देणे, असे प्रकार गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने केले आहेत असे मानले जाईल. केंद्रांवरील प्राचार्य, केंद्र संचालक, समन्वयक यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. 

याबाबत बोलताना डॉ. दीपक माळी म्हणाले, ''गैरमार्ग प्रतिबंध अधिनियम १९८२ अंतर्गत गैरप्रकार करणे, गैरप्रकारास मदत करणे आणि उत्तेजन देणे, या कलम क्रमांक - ३ नुसार कारवाई करण्यात येईल. याबाबत संबंधित केंद्राचे प्राचार्य, केंद्र संचालक, केंद्र समन्वयक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.''

-----------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories