गॅस कनेक्शन बंद करण्याची बनावट नोटीस, पिंपरीत १५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
पिंपरी, ता. २० - गॅस बिल थकित असल्याची बनावट नोटीस पाठवून एका नागरिकाची तब्बल १५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ ते १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.१५ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपद्वारे “MNGL Gas Distribution Private Limited”च्या नावाने गॅस कनेक्शन रात्री ९ वाजता बंद करण्यात येणार असल्याचा संदेश पाठविण्यात आला. तसेच “राकेश पटेल” या नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
फिर्यादी यांनी खात्री करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बिल भरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने फोन करून १० रुपये भरण्यास सांगितले. डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आरोपीने “बिल अपडेट करून देतो” असे सांगत फिर्यादीच्या बँक खात्यातून १५ लाख रुपये काढून घेतले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.