क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवत महिलेची ६९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
पिंपरी, ता. २१ - जुनी सांगवी परिसरात क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेला अटक करण्याची भीती दाखवत तब्बल ६९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक १३ फेब्रुवारी २०२६ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत याप्रकरणी २० मार्च रोजी दुपारी ३.४८ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
अनोळखी आरोपींनी ‘ट्राय डिपार्टमेंट’मधून बोलत असल्याचे सांगून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. तिच्या आधार कार्डचा वापर करुन सिमकार्ड काढण्यात आले. असून त्या क्रमांकावरून अश्लील फोटो, व्हिडिओ आणि संदेश पाठवले जात असल्याच्या तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. तिच्याविरोधात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल असल्याचे भासवून तपास सुरु असल्याचेही सांगितले.
यानंतर आरोपींनी स्वतःला क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे भासवून महिलेला अटक करण्याची भीती दाखवली. या दबावाखाली महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ६९ लाख रुपये ऑनलाईन पाठवण्यास भाग पाडले व महिलेची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी मोबाईल क्रमांकधारक, ‘सुबोध राव’ असे नाव सांगणारा अज्ञात इसम आणि संबंधित बँक खातेदारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.