news
clock
महाराष्ट्र मंडळ लंडनला जागा खरेदीसाठी राज्य सरकारकडून ५ कोटींचा निधी वर्ग

महाराष्ट्र मंडळ लंडनला जागा खरेदीसाठी राज्य सरकारकडून ५ कोटींचा निधी वर्ग

महाराष्ट्र मंडळ लंडनला जागा खरेदीसाठी राज्य सरकारकडून ५ कोटींचा निधी वर्ग

आमदार जगताप यांचे पिंपरी-चिंचवड आणि लंडनमधील मराठी बांधवांकडून कौतुक 

पिंपरी, ता. १२ - युनायटेड किंगडम (यूके) मधील मराठी बांधवांचे हक्काचे आणि प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’या संस्थेच्या वास्तूची जागा “फ्री होल्ड” करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी परकीय चलनाद्वारे वितरित केला आहे. मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यामुळे  मोठे यश आले आहे, अशी  माहिती चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी दिली. या संदर्भातील अधिकृत माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्राद्वारे आमदार शंकर जगताप यांना दिली आहे.

आमदार शंकर जगताप याबाबत म्हणाले, लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन नागरिकांच्या सोयीसाठी आणि तेथील मराठी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणाची मालकी हक्काची जागा खरेदी करणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी संस्थेला आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी लेखी विनंती डिसेंबर २०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मराठी भाषेचा परदेशात प्रसार व संवर्धन करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने या मागणीची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. त्यानुसार मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’मार्फत २५ मार्च २०२६ रोजी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी परकीय चलनाद्वारे थेट लंडन महाराष्ट्र मंडळाला वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून लंडनमध्ये मराठी सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मराठी भाषेचे वर्ग चालवले जातात. आता हक्काची जागा मिळाल्यामुळे तिथे मराठी संस्कृतीचे संवर्धन अधिक जोमाने करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परदेशातील मराठी बांधवांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याचे पिंपरी-चिंचवड आणि लंडनमधील मराठी वर्तुळातून कौतुक होत आहे.


महाराष्ट्र मंडळ...एक हक्काचे घर 

''लंडनमध्ये राहणाऱ्या आपल्या मराठी बांधवांसाठी ‘महाराष्ट्र मंडळ’ हे केवळ एक ठिकाण नसून, सातासमुद्रापार आपली संस्कृती जपणारे ते एक हक्काचे घर आहे. या मंडळाला हक्काची जागा मिळावी, ही तिथल्या मराठी समुदायाची अनेक वर्षांची मागणी होती. या मागणीचा पाठपुरावा करताना, राज्याचे मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. हा निधी म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून, मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा जगभरात प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने दिलेले पाठबळ आहे. आता लंडनच्या भूमीवर आपली मराठी संस्कृती अधिक जोमाने फुलेल आणि भावी पिढीला आपल्या मुळांशी जोडून ठेवेल, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.''

– शंकर जगताप

(आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ)


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories