भारतातील पुरुष कथक नर्तकांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित
Feb 20 2026
44
भारतातील पुरुष कथक नर्तकांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित
पिंपरी, ता. २० - संस्कार भारती पश्चिम प्रांत, पिंपरी-चिंचवड समिती आणि नंदकिशोर कल्चरल सोसायटी यांच्यातर्फे दरवर्षी विविध विषयांवर आधारित दिनदर्शिका काढली जाते. यंदा, भारतातील पुरुष कथक नर्तक हा दिनदर्शिकेचा विषय आहे. यंदाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यातील मोती बागेत पार पडला.
यंदा दिनदर्शिचे चौथे वर्ष आहे. प्रकाशनानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. नंदकिशोर कपोते म्हणाले की, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असल्यामुळे मोती बागेतच या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याची इच्छा होती. ही इच्छा पू्र्ण झाली. भारतातील पुरुष कथक नर्तक हा दिनदर्शिकेचा विषय आहे. सर्वांनी ही वेगळी दिनदर्शिका नक्की घ्यावी.''
''अनेक वर्षांच्या प्रवासातून निरंतर नृत्य कलेची सेवा करून शास्त्रीय नृत्यास प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम डॉ. कपोते यांनी केले. त्यांच्या अनेक शिष्यांनी कथक नृत्य कलेत प्रावीण्य मिळविले आहे, सर्व नृत्य कलाकारांनी संग्रही ठेवावी अशी ही दिनदर्शिका आहे.'' असे मत प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण धबडगाव यांनी व्यक्त केले.
यावेळी सतीश कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, मिलिंद भोळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना आढाव यांनी केले.