वाकडमधील यशविन एन्कोर सोसायटीच्या अपूर्ण प्रवेश रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, रहिवाशांची मागणी
वाकडमधील यशविन एन्कोर सोसायटीच्या अपूर्ण प्रवेश रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, रहिवाशांची मागणी
पिंपरी, ता. २८ जुलै २०२६ - वाकड येथील यशविन एन्कोर कॉ-ऑपेराटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अपूर्ण प्रवेश रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी येथील रहिवशांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत, रहिवाशांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात अपूर्ण प्रवेश रस्त्याचा प्रश्न सविस्तरपण सांगितला आहे. सन २०१९ मध्ये विलास जावडेकर डेव्हलपर्स यांनी या प्रकल्पाची विक्री सुरू करताना ताबा मिळण्यापूर्वी प्रवेश रस्ता पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, विक्री कराराला सात वर्षे आणि भोगवटा प्रमाणपत्र (OC)मिळून चार वर्षे उलटल्यानंतरही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. मोठे खड्डे, पावसाळ्यातील चिखल व निसरडा रस्ता यामुळे रोजचा प्रवास धोकादायक झाला आहे, या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत.
या प्रश्नाबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला असता, संबंधित रस्त्याची जमीन महानगरपालिकेच्या ताब्यात नाही असे उत्तर येथील रहिवाशांना ऐकायला मिळाले आहे. अधिकृत व सुरक्षित प्रवेश रस्ता उपलब्ध नसताना या प्रकल्पाला बांधकाम परवानगी, विकास परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्र कसे देण्यात आले ? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.
रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
यशविन एन्कोर A1A2 आणि B1B2 मधील रहिवाशांनी गेल्या काही वर्षांत मालमत्ता कराच्या स्वरूपात एकत्रितपणे कोट्यवधी रुपये पुणे महानगरपालिकेला अदा केले आहेत. तरीही आजपर्यंत सुरक्षित आणि सुस्थितीत प्रवेश रस्त्यासारखी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. कर वेळेवर भरूनही मूलभूत सुविधा न मिळणे हे प्रशासनाची अकार्यक्षमता व बेजबाबदारपणा दाखवून देत आहे.
यशविन एन्कोर या प्रकल्पात ३४० हून अधिक कुटुंबे आणि २,००० पेक्षा जास्त नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना सुविधा मिळणे व सार्वजनिक सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील प्रवेश रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी पुन्हा रहिवाशांनी केली आहे.