मोकाट श्वानाची नसबंदी, रेबीज लसीकरणाचे प्रमाण तसेच श्वान निवारा केंद्र वाढवण्याचे नियोजन, महापालिका आयुक्तांची माहिती
मोकाट श्वानाची नसबंदी, रेबीज लसीकरणाचे प्रमाण तसेच श्वान निवारा केंद्र वाढवण्याचे नियोजन, महापालिका आयुक्तांची माहिती
पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - दोन दिवसांपूर्वी म्हेत्रेवस्ती चिखली येथे भटक्या कुत्र्यांनी लहान मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत ही बालिका गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोकाट कु्त्र्यांच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली आहे. शहरात मोकाट श्वानांची नसबंदी व रेबीज लसीकरण आणि निवारा केंद्र वाढवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, म्हेत्रेवस्ती येथे लहान मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना गंभीर आहे. महापालिकेचे डॉक्टर मुलीच्या घरी जाऊन आले. सुदैवाने बालिकेची प्रकृती स्थिर आहे. यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून प्रशासनाची तातडीने बैठक झाली. त्यात भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी उपायोजनांचे आदेश दिले आहेत.
गेल्या सहा वर्षांत सुमारे ६५ हजार श्वानांची नसबंदी केली आहे. तसेच सुमारे ७० हजार श्वासनांचे रेबीज लसीकरण केले आहे. आता श्वान नसबंदी व रेबीज लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचे तसेच श्वान निवारा केंद्र (शेल्टर्स) वाढवण्याचे नियोजन केले आहे. सध्या शहरात १ शेल्टर आहे. एक हजार श्वान राहू शकतील अशी पाच शेल्टर प्रस्तावित केली आहेत. ती श्वान निवारा केंद्र खासगी-सार्वजनिक भागादारी तत्त्वावर (पीपीपी) चालवली जातील.
मोकाट श्वानांबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास महापालिकेकडून ताबडबोब श्वान बंदोबस्त पथक पाठवत आहोत. याआधी प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला अलसल्यास त्याबाबत चौकशी करण्याची उपायुक्तांना सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तावर त्वरित कार्यवाहीची अपेक्षा
काही महिन्यांपूर्वी महापालिका सभेत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मात्र, तरीही शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. शहराच्या सर्वच भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक त्रासले असून भितीचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानी गांभिर्याने या विषयाकडे लक्ष द्यावे, हीच नागरिकांची मागणी आहे.