तत्पर सेवेसाठी अग्निशमन विभाग सदैव सज्ज - व्यंकटेश दुर्वास .................. अग्निशमन विभागाच्या वतीने राष्ट्रीय अग्निसुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ, आठवडाभर विशेष अग्निसुरक्षा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक उपक्रम
तत्पर सेवेसाठी अग्निशमन विभाग सदैव सज्ज - व्यंकटेश दुर्वास
अग्निशमन विभागाच्या वतीने राष्ट्रीय अग्निसुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ, आठवडाभर विशेष अग्निसुरक्षा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक उपक्रम
पिंपरी, ता. १४ - '' अग्निशमन विभागाच्या माध्यमातून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना समाजसेवेची संधीच मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना तत्पर, प्रभावी आणि वेळेवर सेवा देण्यासाठी सदैव सज्ज आहेत.'' असे विश्वास महापालिका अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ दरम्यान ‘राष्ट्रीय अग्नि सुरक्षा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची सुरुवात संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या सप्ताहात अग्निशमन विभागाचे कर्मचारी शहरातील महानगरपालिका कार्यालये, पोलीस स्टेशन, रुग्णालये, शाळा तसेच रहिवासी सोसायट्यांमध्ये अग्निसुरक्षा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देणार आहेत. या माध्यमातून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे
या प्रसंगी उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी शहीद अग्निशमन कर्मचाऱ्यांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी चंद्रशेखर घुले, गौतम इंगवले, दिलीप गायकवाड, अनिल डिंबळे, श्रीकांत वैरागळ, सुनिल फरांदे यांच्यासह अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपायुक्त दुर्वास म्हणाले, ''आपत्ती व्यवस्थापनात ‘प्रतिबंध (प्रिव्हेन्शन), पूर्वतयारी (प्रिपेअरनेस) आणि तात्काळ प्रतिसाद (रिस्पॉन्स)’ या तीन घटकांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिल्यास अनेक दुर्घटना टाळता येऊ शकतात, तर योग्य पूर्वतयारीमुळे आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाता येते. तात्काळ आणि समन्वयित प्रतिसादामुळे जीवित व मालमत्तेचे होणारे नुकसान वाचवता येते. या तिन्ही बाबींचा समतोल राखणे हेच यशस्वी आपत्ती व्यवस्थापनाचे सूत्र आहे. २०१९ मध्ये दापोडी येथे घडलेल्या दुर्घटनेत शहीद झालेले अग्निशमन कर्मचारी विशाल जाधव यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा अग्निशमन विभागाला अभिमान आहे.''
अग्निसुरक्षा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक...महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांना तत्पर, प्रभावी आणि वेळेवर सेवा देण्यासाठी सदैव सज्ज आहे.
अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी, कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न…!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान आयोजित अग्नि सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या दि महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस पर्सोनेल वेल्फेअर असोसिएशनसाठी निधी संकलन उपक्रमाची सुरुवात उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत मदत तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला जात आहे. यावेळी अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘सेवा परमो धर्म’ या भावनेतून योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले असून, अशा उपक्रमांमुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त होऊन सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे नमूद करण्यात आले.