'अभय योजने'चा योजनेचा लाभ घ्या, मालमत्ता कर भरा, महापालिकेचे आवाहन
योजनेचा आज शेवटचा दिवस, १ ते २९ मार्चपर्यंत ५५ हजार ७११ थकबाकीदारांनी घेतला लाभ
पिंपरी, ता. ३१ - मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेने राबवलेल्या अभय योजनेचा २९ मार्चपर्यंत ५५ हजार ७११ थकबाकीदारांनी लाभ घेतला आहे. अभय योजना १ मार्च पासून लागू झाली. तेव्हापासून २९ तारखेपर्यंत १५७ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांचा मालमत्ताकर वसूल झाला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. मंगळवारी (ता. ३१) अभय योजनेचा कालावधी संपत आहे. ज्यांनी अद्याप मालमत्ताकर भरला नाही, अभय योजनेचा लाभ घ्यावा व आपला मालमत्ताकर त्वरीत भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेने सांगितले आहे की, गेल्या २९ दिवसांमध्ये एकूण ६८ हजार ४८८ मालमत्ताधारकांनी १५७ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. यापैकी ५५ हजारांहून अधिक थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेतला असून, त्यांना एकूण ३८ कोटी ८१ लाख रुपयांची दंडावरील सवलत देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, महसुलातही वाढ झाली आहे.
मंगळवारी, ३१ मार्चला रात्री बारापर्यंत ही योजना लागू राहणार आहे. थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकी तत्काळ भरावी, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे. शेवटच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागीय कर संकलन कार्यालयांचे कॅश काउंटर सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाइन पेमेंट, धनादेशाद्वारे भरणा आणि कॅश काउंटर अशा विविध माध्यमांद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.