शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक, चिंचवडमधील घटना
पिंपरी, ता. २५ - शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका नोकरदार व्यक्तीची तब्बल ४२ लाख ४८ हजार ९०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार चिंचवड येथे समोर आला आहे. ही घटना ११ नोव्हेंबर २०२५ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी, मंगळवारी (ता. २४) चिंचवड पोलिस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, महेश विलास सगरे (वय ५१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ११ ते २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ या कालावधीत ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादी यांना व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. तसेच एक अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. शेअर ट्रेडिंगमधून अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत विविध बँक खात्यांमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली रक्कम भरण्यास सांगितले.
फिर्यादी सगरे यांनी आरोपींच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले. संबंधित अॅपवर खोटा नफा दर्शविण्यात आला. नफा काढण्यासाठी कर (टॅक्स) व इतर शुल्कांच्या कारणाखाली पुन्हा पुन्हा रक्कम भरण्यास भाग पाडले आणि फिर्यादीची एकूण ४२ लाख ४८ हजार ९०० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
आरोपींमध्ये मिताली मिश्रा नामक महिला तसेच विविध बँक खातेदारांचा समावेश असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ (२) (c)(x), ३(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.