शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून तरुणाला १४ लाखांना गंडा, पिंपळे सौदागरमधील घटना
पिंपरी, ता. २५ - शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून पिंपळे सौदागर येथील एका तरुणाची ऑनलाइन १४ लाख २९ हजार ९० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात मंगळवारी (ता. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन कुमार सिन्हा (वय ३७, रा. कोकोनेस्ट सोसायटी, राहटणी चौक, पिंपळे सौदागर) यांना ९ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. या ग्रुपवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी दाखवले.
ग्रुपमधून एका लिंकद्वारे एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. स्वतःला अॅडव्हायझर म्हणून ओळख करून देणाऱ्या दोन व्यक्तींनी फिर्यादीशी संपर्क साधून शेअर खरेदी-विक्रीबाबत मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. आरोपींनी जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत वेळोवेळी रक्कम जमा करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी एकूण १४ लाख २९ हजार ९० रुपये विविध व्यवहारांद्वारे जमा केले. मात्र, परतावा किंवा गुंतवलेली रक्कम न देता आरोपींनी विश्वासघात करुन सिन्हा यांची फसवणूक केली. आरोपींमध्ये प्राजक्त सांमत व नेहा आय्यर नामक व्यक्ती तसेच बॅंक खातेधारक यांचा समावेश आहे.
या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अन्वये सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झाली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.