पिंपरी-चिंचवड सायकल संघाची स्थापना, उद्या 'सायकल रेस'चे आयोजन
पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकजण सायकलिंगसाठी नियमितपणे विविध ठिकाणी जात असतात. या सायकलिंगपटूंनी एकत्र येऊन १ एप्रिलला सायकल संघ पिंपरी-चिंचवड (CSPC) या नव्या संघटनेची स्थापना १ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे, हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे.
संघटनेचा पहिला उपक्रम म्हणजे 'सायकल रेस' रविवारी (ता. ५) आयोजित केली आहे. ही स्पर्धा चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिर ते थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर या मार्गावर पहाटे ४.३० वाजता सुरु होणार असून, सुमारे १०० सायकलपटू यात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
संघटनेचा अधिकृत प्रारंभ, चिन्हाचे अनावरण आणि जर्सी प्रदर्शनाचा कार्यक्रम निगडी-प्राधिकरणातील येथील स्वातंत्रवीर सावरकर सदनमधील कॅप्टन कदम सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला इंडो अॅथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष आणि सॉफ्टवेअर अभियंता गजानन शिवाजीराव खैरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संस्थेच्या चिन्हाचे व जर्सीचे अनावरण करण्यात आले. खैरे यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. उपस्थित सायकलपटूंना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र विश्वनाथ पेंडसे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे व आगामी उपक्रमांविषयी उमेश एकनाथ कुटे यांनी माहिती दिली. “जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होत स्वतःचे आरोग्य सुधारावे आणि पुण्याची ‘सायकलचे शहर’ ही ओळख पुन्हा मिळवावी,” असे आवाहन कुटे यांनी केले. रवींद्र होनराव यांनी प्रास्ताविक केले. अतुल सुबंध यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सायकलपटू व सायकलप्रेमी उपस्थित होते.