बाणेर-पाषाण लिंक रोडवरील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी
Feb 27 2026
41
बाणेर-पाषाण लिंक रोडवरील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी
पुणे पोलिसांकडून तत्काळ कसून तपासणी, धमकी खोटी असल्याचे निष्पन्न
पिंपरी, ता. २७ - पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवरील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल काल गुरुवारी (ता. २६) या कार्यालयाला आला. त्यानंतर या कार्यालयात एकाएकी भितीचे सावट पसरले. या प्रकाराची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) बोलावले. पथकाने कार्यालयाची इमारत, पार्किंग, कार्यालयाचा संपूर्ण परिसर व आजूबाजूच्या परिसराची बारकाईने तपासणी केली. या तपासणीत संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळली नाहीत. त्यामुळे, पासपोर्ट कार्यालयाला ई-मेलद्वारे मिळालेली धमकी खोटी असल्याचे समजले.
बाणेर-पाषाण लिंक रोडवरील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला हा धमकीचा ई-मेल कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर सकाळी सुमारे १० वाजता प्राप्त झाला. या ईमेलमध्ये पासपोर्ट कार्यालय आरडीएक्स स्फोटकाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी जतिन रवींद्र पोटे (वय ५३) यांनी तातडीने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात ईमेल धारकाविरोधात गुन्हा नोंदवला असून, सायबर पोलिसांच्या मदतीने ई-मेलचा आयपी अॅड्रेस आणि प्रेषकाचा शोध घेतला जात आहे.
परिमंडळ - ४ चे पोलीस उप-आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. बॉम्ब शोधक व नाशक पथकानेही कसून तपासणी केली. यावेळी,
पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत पुण्यात सरकारी कार्यालये, न्यायालये आणि पोस्ट ऑफिस यांना अशा धमकीचे ई-मेल मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा घटना खोट्या असल्या तरी त्यामुळे सरकारी कामकाजात व्यत्यय येतो, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल.