नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या अंतर्गत रस्त्यांचे केवळ डांबरीकरण, पुणे महापालिकेचा निर्णय
Apr 03 2026
104
नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या अंतर्गत रस्त्यांचे केवळ डांबरीकरण, पुणे महापालिकेचा निर्णय
पुणे, ता. ३ - सिमेंटच्या रस्त्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता मोठ्या प्रमाणात साचून राहते व रहवासी भागांमध्ये शिरते त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा अनेक असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पुणे महापालिका आता शहरातील नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण न करता डांबरीकरण केले जाणार आहे.
पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबत परिपत्रक काढण्याचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना दिले आहेत. शहरात सुमारे ९०० किलोमीटर लांबीचे आणि सहा ते १२ मीटर रुंदीचे अरुंद रस्ते आहेत.
सिमेंट रस्त्याचा खर्च प्रति चौरस मीटर सहा हजार रुपये असून, डांबरी रस्त्यासाठी चार हजार ५०० रुपये खर्च येतो. त्यामुळे नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचे केवळ डांबरीकरण केल्यास खर्च कमी होणार आहे. याशिवाय, पाणी साचून राहण्याची समस्याही कमी होणार आहे. शहरात सध्या ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे आहेत.