सांगवी | स्टील मटेरियलचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून बनावट इनव्हॉइस आणि GST नोंदणीचे प्रमाणपत्र पाठवत एका व्यापाऱ्याची 6.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सांगवी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मोबाइल क्रमांकधारक, बँक खातेधारक आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पिंपळे सौदागर परिसरातील व्यापाऱ्याला वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन आणि व्हॉट्सअॅप कॉल करण्यात आले. संपर्क करणाऱ्यांनी स्वतःला कर्नाटकातील भालकी येथील स्टील मटेरियल पुरवठादार असल्याचे भासवले. स्टीलचा नियमित व विश्वासार्ह पुरवठा करता येईल, असे सांगून त्यांनी व्यापाऱ्याशी व्यवहार सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी खोटे इनव्हॉइस तसेच बनावट GSTIN Registration Certificate पाठवले. कागदपत्रे अधिकृत असल्याचे भासवल्याने व्यापाऱ्याने मटेरियल खरेदीसाठी रक्कम पाठवण्यास सुरुवात केली. आरोपींनी दिलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर वेगवेगळ्या वेळी पैसे जमा करण्यास सांगितले.
तक्रारीनुसार, व्यापाऱ्याकडून एकूण 6.50 लाख रुपये घेण्यात आले. रक्कम दिल्यानंतर अपेक्षित स्टील मटेरियलचा पुरवठा झाला नाही. संपर्कातील व्यक्ती व दिलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि अन्य संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बँक खाते, मोबाइल क्रमांक आणि डिजिटल व्यवहारांची माहिती तपासली जात असून सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.