news
clock
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी देहूमध्ये आढावा बैठक, भाविकांसाठी सोयीसुविधांबाबत चर्चा

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी देहूमध्ये आढावा बैठक, भाविकांसाठी सोयीसुविधांबाबत चर्चा

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी देहूमध्ये आढावा बैठक, भाविकांसाठी सोयीसुविधांबाबत चर्चा  

पिंपरी, ता. १९ - श्री क्षेत्र देहूगाव येथे ५ मार्चला संत तुकाराम महाराज बीज सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये राज्यभरातून भाविक सहभागी होत असतात. त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा सज्ज ठेवण्यासाठी शासकीय स्तरावर नियोजनबद्ध तयारी करण्याची मागणी संत तुकाराम महाराज संस्थानने केली आहे.

या संदर्भात देहूगाव येथील देऊळवाडा येथे शासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांची समन्वय बैठक नुकतीच पार पडली. संत तुकाराम महाराज बीज सोहळा ही वारकरी संप्रदायातील महत्त्वाची परंपरा असल्याने हा सोहळा सुरळीत-शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी बैठकीमध्ये नियोजन करण्यात आले.

संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे यांनी बीज सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा, मुबलक पिण्याचे पाणी, सुरळीत वाहतूक व्यवस्था, पुरेशी पोलिस बंदोबस्त आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करण्याची मागणी केली. त्यावर अपर तहसीलदार देशमुख यांनी संबंधित विभागांनी दरवर्षीप्रमाणे पूर्वतयारी पूर्ण करुन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या.

पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी शासकीय विभागांमध्ये समन्वय ठेवून बीज सोहळ्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. २६ फेब्रुवारीला सोहळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करुन पुढील नियोजनासाठी आणखी एक बैठक होईल, असे सांगण्यात आले. 

बैठकीला पिंपरी-चिंचवडचे अपर तहसीलदार जयराज देशमुख, देहू संस्थानचे अध्यक्ष हभप जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर, देहूरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक अजय चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories