गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पिंपरी, ता. १७ - खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. सायकल भेट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला.
या प्रसंगी महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते विश्वजित बारणे, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, बाळासाहेब ओव्हाळ, धनाजी बारणे, धनाजी विनोदे, शांताराम भोंडवे, नंदू जाधव, माऊली घोगरे, बाळासाहेब वाघमोडे उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. समाजातील गरजवंताचा शोध घेऊन त्यांना विविध माध्यमातून मदत केली जाते. यंदा शहरातील शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. त्यांची शाळेत जाण्याची अडचण ओळखून सायकल वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार असून सायकलवर वेळेत शाळेत जाता येणार आहे.
यावेळी, मनोगत व्यक्त करताना, खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ''वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसतो. समाजाला काहीतरी परत देण्याची संधी आहे. याच भावनेतून वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांची प्रगती हाच माझ्यासाठी खरा आनंद आहे.''
--------------------------------------------------------------------------------------------