यंदा 'पवनाथडी जत्रा' भरणार सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर, २५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आयोजन
हस्तकला, खाद्यपदार्थ, गृहउद्योग उत्पादने आणि पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी महिला बचत गटांना नावनोंदणीचे समाज विकास विभागाचे आवाहन
पिंपरी, ता. १७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे आयोजित केली जाणारी पवनाथडी जत्रा यंदा २५ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर भरणार आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांमध्ये विक्री कौशल्यांचा विकास करणे तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन करणे हा जत्रेचा मुख्य उद्देश आहे.
सन २०२६ या आर्थिक वर्षातील जत्रेसाठी सहभाग अर्जांचे वाटप व स्वीकृती १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु करण्यात आली होती. १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुमारे २,५०० अर्ज महिला बचत गट, खासदार, आमदार व नगरसेवक यांच्याकडे वाटप करण्यात आले असून त्यापैकी १६८ अर्ज समाज विकास विभागाकडे प्राप्त झाले आहेत. जत्रेत सहभाग घेण्यासाठी बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, संबंधित महिलेचे आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत व छायाचित्र ही कागदपत्र आवश्यक आहेत. अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी २०२६ आहे.
बचत गटांना उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ.....
पवना थडी जत्रेमध्ये महिला बचत गटांना मोठे आपल्या वस्तू व पदार्थ विक्रीसाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे. याद्वारे जास्तीत जास्त महिला बचत गटांना या जत्रेत आपल्या उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ मिळणार आहे...
- रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका