नागरीकांसाठी मार्गदर्शक असणारी 'सारथी' वेबसाईट महापालिकेने तातडीने सुरु करावी
Feb 17 2026
61
नागरीकांसाठी मार्गदर्शक असणारी 'सारथी' वेबसाईट महापालिकेने तातडीने सुरु करावी
माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विनोद नढे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी, ता. १७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘सारथी’ हे संकेतस्थळ (System for Assistance to Residents and Tourists through Helpline Information) गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना विविध सेवा व तक्रार नोंदणीसाठी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हे संकेतस्थळ तातडीने सुरु करावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विनोद नढे यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘सारथी’ पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित माहिती मिळत होती. तसेच तक्रारी ऑनलाइन नोंदविण्याची सोय उपलब्ध होती. मात्र हे संकेतस्थळ दीर्घकाळ बंद असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत असून तक्रारींच्या निराकरणालाही विलंब होत आहे. त्यामुळे, सारथी पोर्टल बंद असण्यामागील तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणे काय आहेत, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कोणत्या विभागाकडे किंवा बाह्य कंपनीकडे आहे, तसेच बंद कालावधीत नागरिकांच्या तक्रारी कोणत्या माध्यमातून स्वीकारल्या जात आहेत, याबाबत माहिती मिळावी.
भविष्यात अशा प्रकारे प्रणाली बंद पडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. डिजिटल सेवांसाठी मोठा निधी खर्च होत असताना नागरिकांना अखंडित सेवा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. महापालिका प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन ‘सारथी’ पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करावे आणि संबंधित जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नढे यांनी केली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------