पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

पिंपरी, दि. ९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सव श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरा करताना पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या स्वच्छतेची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा, असे त्यांनी सांगितले.

गणेशमूर्तीची निवड करताना शाडू मातीच्या आणि नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. जलप्रदूषण टाळण्यासाठी पीओपीच्या मूर्तींचा वापर टाळून महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौद किंवा जलकुंडातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य नदी, नाला किंवा तलावात विसर्जित न करता महापालिकेच्या निर्माल्य संकलन केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे जमा करावे. ओला, सुका आणि विशेष काळजीचा कचरा स्वतंत्रपणे देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

मंडप आणि घरगुती सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून नैसर्गिक आणि पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करावा. विद्युत रोषणाईसाठी एलईडी दिव्यांचा वापर करून ऊर्जाबचतीला प्राधान्य द्यावे. तसेच ध्वनीविषयक नियमांचे पालन करून ध्वनी प्रदूषण टाळावे.

“श्रद्धा आणि उत्साहासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत शहराचा संकल्प प्रत्यक्षात येईल,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही नागरिकांनी कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, निर्माल्य संकलन आणि कृत्रिम विसर्जनस्थळांचा वापर करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories