थेरगावमध्ये महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी फरार
पिंपरी, ता. २६ - वैयक्तिक गैरसमजातून एका पुरुषाने एका महिलेवर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये महिला व तिला हल्ल्यातून सोडवण्यास आलेली तिची बहिणही जखमी झाल्या. ही घटना थेरगावमधील जगतापनगर लेन क्रमांक ४ परिसरात सोमवारी (ता. २४) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली आहे. हल्ला करुन आरोपी तेथून पळून गेला आहे. आरोपी विरोधात बुधवारी (ता. २५) काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत श्रीमती उषा अतुल इंगवले (वय २८, व्यवसाय – हाऊसकीपिंग, रा. जगताप नगर लेन क्र. ४, थेरगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी योगेश संतोष रणदिवे (रा. जगताप नगर लेन क्र. ४, थेरगाव, पुणे) याने फिर्यादीमुळे आपला संसार उद्ध्वस्त झाल्याचा गैरसमज करून हातातील लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर व डाव्या हातावर वार करुन गंभीर जखमी केले. यावेळी, फिर्यादीला सोडविण्यासाठी आलेली तिची बहिण आशा सोमनाथ बनसोडे यांनाही आरोपीने कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर आरोपी शिवीगाळ करत घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११८ (१), ३५२ तसेच आर्म अॅक्ट कलम ४ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.