जुन्या भांडणाच्या रागातून तीन मित्रांवर प्राणघातक हल्ला
पिंपरी, ता. १७ - जुन्या भांडणाचा राग मनात धरुन पाच जणांनी मिळून तीन मित्रांना दगडाने, लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना रविवारी (ता. १५) एमआयडीसी भोसरी परिसरात घडली आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत, सोनू बाबुलाल गौतम (वय १७ वर्षे, पेटिंग काम, रा. एम.आय.डी.सी. भोसरी) याने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मारहाणीच्या घटनेमध्ये १) रघुनाथ त्रिंबक आव्हाड (वय-अंदाजे ५० वर्षे), २) समाधान दुधभाते (वय अंदाजे २५ वर्षे), ३) ओमकार दुधभाते (वय अंदाजे २२ वर्षे), ४) अविनाश दत्ता काकडे (वय अंदाजे २० वर्षे) व ५) एक महिला (वय अंदाजे ४५) हे आरोपी आहेत.
आरोपींनी फिर्यादी सोनू व फिर्यादीचे मित्र दिनेश नरबहादुर बूल व सागर प्रधान यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. "तुम्हाला सगळ्यांना आता ठेवणार नाही" असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी दगडाने फिर्यादीचे डोक्यात मारले व लोखंडी पाईपने मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा कलम १०९ (१), १८९ (१), १८९ (२), १८९ (४), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------