सावरदरी | ३१ ऑगस्ट २०२६ : सावरदरी येथील कंपनीच्या पार्किंगमध्ये लावलेली बजाज प्लॅटिना मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या दुचाकीची किंमत ७२ हजार रुपये असून, याबाबत भूषण रामनाथ वर्पे वय २६ रा.सावरदारी यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत सावरदरी येथील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये ही चोरी झाली.
फिर्यादी यांनी दुचाकी पार्क करून ठेवली असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इराद्याने ती चोरून नेली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.