विधी समिती सभेत पावसाळा कालावधीत 'आपदा मित्र' स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्वावर नेमणूक करण्यास मंजुरी
विधी समिती सभेत पावसाळा कालावधीत 'आपदा मित्र' स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्वावर नेमणूक करण्यास मंजुरी
पिंपरी, ता. १४ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विधी समिती सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विधी समिती सभेत पावसाळा कालावधीसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी 'आपदा मित्र' स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्वावर नियुक्ती करण्याच्या विषयास आज मंजुरी देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीस विधी समिती सदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त संदीप खोत, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक, गतिमान आणि सक्षम होण्यासाठी ही नियुक्ती करण्यात येणार असून, मान्सूनपूर्व तयारी २०२६ अंतर्गत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थिती, पूरस्थिती, पाणी साचणे, झाडे पडणे, दुर्घटना तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
याअंतर्गत शासनमान्य संस्थांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले “आपदा मित्र”, राज्य अग्निशमन दल तसेच नागरी संरक्षण दलातील प्रशिक्षित स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच महिन्यांच्या कालावधीसाठी किमान ५० अनुभवी आपदा मित्र स्वयंसेवकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार असून, या स्वयंसेवकांना कामगार कल्याण विभागाकडील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन दरानुसार मानधन अदा करण्यात येणार आहे.
हे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने विविध आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद देणे, बचावकार्यामध्ये मदत करणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, पूरपरिस्थितीमध्ये सहाय्य करणे, आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करणे आदी जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.