news
clock
वाकड–म्हातोबानगर परिसरात अनधिकृत झोपड्या व बांधकामे भुईसपाट

वाकड–म्हातोबानगर परिसरात अनधिकृत झोपड्या व बांधकामे भुईसपाट

वाकड–म्हातोबानगर परिसरात अनधिकृत झोपड्या व बांधकामे भुईसपाट 

महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई, १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या व बांधकामे हटवली 

पिंपरी, ता. ७ -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या वाकड-म्हातोबानगर येथील २४ मीटर डिपी रस्त्यावरील १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या तसेच बांधकामे मंगळवारी (ता. ७) हटवण्यात आली. रस्ता रुंदीकरणासाठी सदर कारवाई करण्यात आली, अशी माहिती महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली. 

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता आर. व्ही. शिंदे, दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

महापालिका स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, प्रशासन व स्थापत्य, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे  जवान यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता. 

नियोजनबद्ध शहर विकासासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात विविध सार्वजनिक सुविधा, रस्ते व पायाभूत प्रकल्पांसाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. शहराचा नियोजित आणि सुटसुटीत विकास साधण्यासाठी या आरक्षित जागा अतिक्रमणमुक्त ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी विकास आराखड्यातील आरक्षित जागांवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करू नये. तसेच, आरक्षित जागांवरील अतिक्रमणांमुळे भविष्यात विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि अशा अतिक्रमणांवर नियमानुसार हटवण्याची कारवाई केली जाईल, याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. नियोजनबद्ध शहर विकासासाठी नागरिकांचे सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.  


अतिक्रमण हटविणे अत्यावश्यक...

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक सुविधा सक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन दृष्टीने सक्षम करण्यासाठी अतिक्रमण हटविणे अत्यावश्यक आहे. अशा कारवायांना नागरिकांनी सहकार्य केल्यास अशा कारवाया अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने राबविता येतील. शहर अधिक सुंदर, सुबक आणि सुसज्ज करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील सोयीसुविधांसाठी महापालिकेच्या उपक्रमांना नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. 

- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories