रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शंभर सायकलींचे वाटप
पिंपरी, ता. १३ - मावळ तालुक्यातील चांदखेड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण (पुणे) व खासगी कंपनीच्या सीएसआर निधीतून होतकरु व गरजू विद्यार्थ्यांना शंभर सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे.
सायकल वाटप कार्यक्रमासाठी कंपनीचे क्लस्टर हेड कुलदीप थोरगुले, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष दीपा जावडेकर, प्रकल्प संचालक भूषण ढाके, बलवीर चावला, शशिकांत पांडे, पराग जोशी तसेच मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता येवले, पाचाणे गावचे माजी सरपंच मनोज येवले, मुख्याध्यापक अजिनाथ ओगले, पर्यवेक्षक तानाजी मुकणे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नितीन टेकळे, दिनेश गायकवाड, सचिन गायकवाड, सचिन रायकर व महेश बारमुख उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड, भैरवनाथ विद्यालय घोनशेत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - पाचाणे, संत ज्ञानेश्वर विद्यालय - दिवड या विद्यालयांतील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती. महिला दिनानिमित्त रोटरी क्लबने विद्यालयातील विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड मशीन भेट दिली. स्वप्नाली केमसे यांनी सूत्रसंचालन केले.