काळेवाडी–विजयनगरमधील पाणी पुरवठा स्वच्छ-सुरळीत करावा, अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा
माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील काळेवाडी–विजयनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या संदर्भात माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सात दिवसांत पाणीपुरवठा स्वच्छ व सुरळीत झाला नाही तर या परिसरातील महिलांच्या वतीने महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडी–विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर, काळेवाडी स्मशानभूमी परिसर, आशीर्वाद कॉलनी, सहकार कॉलनी, आजाद कॉलनी, काळेवाडी गावठाण तसेच ज्योतिबानगर या भागांमध्ये मागील आठवडाभरापासून दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ताप, उलटी, जुलाब यांसारख्या आजारांचा त्रास होऊ लागला असून अनेक नागरिक आजारी पडत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना तात्काळ स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी मच्छिंद्र तापकीर यांनी आयुक्तांकडे केली आहे. पुढील सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ झाला नाही तर काळेवाडी-विजयनगर परिसरातील महिलांच्या वतीने महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.