शिवजयंती उत्सवासाठी आयोजित नियोजन बैठकीमध्ये विविध सूचना प्राप्त  

पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेमध्ये नुकतीच नियोजन बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सहभागी प्रतिनिधींनी शिवजयंतीनिमित्त महापालिका शाळांमध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित विविध स्पर्धा आयोजित कराव्यात, भक्ती-शक्ती समूहशिल्पाची डागडुजी व स्वच्छता करावी, शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित महानाट्याचे आयोजन करावे, अशा सूचना मांडल्या. 

बुधवारी (ता. ४) झालेल्या या बैठकीला शहरातील विविध शिवजयंती उत्सव समिती, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहशहर अभियंता मनोज सेठिया, ममता शिंदे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव जाधव, जीवन बोराडे, सागर तापकीर, प्रकाश जाधव, अॅड. लक्ष्मण रानवडे, सतीश काळे, समीर जावळकर, वसंत पाटील यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

''छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ च्या अनुषंगाने प्राप्त सूचनांवर संबंधित विभागांमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. प्रबोधन पर्व अधिक नियोजनबद्ध, प्रभावी व नागरिकांच्या व्यापक सहभागातून राबविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन सकारात्मक आहे. आवश्यक सर्व सुविधा व समन्वय उपलब्ध करून दिला जाईल.'', असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले. 

बैठकीमध्ये चर्चिलेले विषय पुढीलप्रमाणे ....

- समूहशिल्पाची डागडुजी करून परिसराची स्वच्छता करावी

- भक्ती-शक्ती समूहशिल्पास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आवश्यक तयारी करावी

- भक्ती-शक्ती उड्डाणपुलास कार्यक्रमाच्या आठवडाभर आधी विद्युत रोषणाई करावी

- एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नागरिकांना दाखवावा

- शालेय विद्यार्थ्यांसोबतच खुल्या प्रवर्गासाठी पोवाडे, निबंध, वकृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करावे

- पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरातही कार्यक्रमांचे आयोजन करावे

- विविध शहरांतून ज्योत घेऊन येणाऱ्या शिवप्रेमींचा यथोचित सन्मान करावा

- महानाट्य व इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी स्वच्छतागृह, पार्किंग व सुरक्षेची पुरेशी व्यवस्था करावी

- रक्तदान शिबिरांच्या ठिकाणी पंखे, पिण्याचे पाणी व कुलरची व्यवस्था करावी

- प्रबोधन पर्वाच्या नियोजनात अधिक सुसूत्रता येण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारीऐवजी जानेवारी महिन्याच्या   पहिल्या आठवड्यात नियोजन बैठक घ्यावी

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance