शिवजयंतीनिमित्त रहाटणीमध्ये उद्या सायंकाळी वाहतूक मार्गात बदल
पिंपरी, ता. १८ - शिवजयंतीनिमित्त रहाटणी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजयंती उत्सवाचे उद्या (ता. १९) आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने परिसरातील वाहतूकीमध्ये सायंकाळी ५ ते १० या वेळेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरीकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांतील वाहने या बदलातून वगळली जातील.
असे असतील पर्यायी मार्ग -
१) रहाटणी फाटा चौकातून गोविंद चौकाकडे जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग : काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
२) गोविंद चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक (रहाटणी गाव) बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.
पर्यायी मार्ग : गोविंद चौक ते कोकणे चौक मार्गे वळविण्यात येईल.
३) महादेव मंदिर/पिंपळे सौदागर पोलीस चौकी टी-पॉइंटकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
पर्यायी मार्ग : महादेव मंदिर/पिंपळे सौदागर पोलीस चौकी येथून पी. के. चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
४) जीवन ज्योती हॉस्पिटलजवळील टी-पॉइंटकडून पुतळा चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.
पर्यायी मार्ग : जीवन ज्योती हॉस्पिटलजवळील टी-पॉइंट ते पी. के. चौक मार्गे वाहतूक सुरू राहील.
----------------------------------------------------------------------