शहरात ३ ते ५ मार्चपर्यंत रंगणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजन
Feb 28 2026
31
शहरात ३ ते ५ मार्चपर्यंत रंगणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजन
पिंपरी, ता. २८ - यंदाचा पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ३ ते ५ मार्चपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या महोत्सवात ४३ देशांतील ११६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि दीर्घपट अशा विविध प्रकारांचा त्यात समावेश आहे. निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणाऱ्या या चित्रपट महोत्सवासाठी नागरीकांना विनाशुल्क प्रवेश आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे महोत्सवासाठी सहकार्य लाभले आहे.
महोत्सवात, भारतासह अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण कोरिया, अर्जेटिना, तुर्की, इराण, दक्षिण आफ्रिका आदी देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. विज्ञान-अंधश्रद्धा, पर्यावरण, तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, सामाजिक समता, आरोग्य, बालहक्क, हवामान बदल आणि मानवी मूल्ये अशा विविध विषयांवरील हे चित्रपट पाहण्याची शहरवासियांना छानशी संधी मिळणार आहे.
यंदा, चित्रपट क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक' हा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. समारोपाच्या दिवशी (ता. ५) महोत्सवातील विविध स्पर्धा विभागांतील उत्कृष्ट चित्रपटांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.