पिंपरी-चिंचवड पोलिसांना पासपोर्ट पडताळणी प्रकियेबाबत मिळाले मार्गदर्शन
पासपोर्ट पडताळणी प्रकिया अधिक कार्यक्षम व जलद करण्यासाठी आयोजन
पिंपरी, ता. २० - पासपोर्ट पडताळणी प्रकिया अधिक कार्यक्षम व जलद करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात १२ मार्चला पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्यासाठी प्रशिक्षण सत्र पार पडले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण सत्रामध्ये प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ विनोद गायकवाड, विशेष शाखेचे पोलीस उप-आयुक्त प्रदीप जाधव, पासपोर्ट उप अधिकारी श्रुती पांडे, विशेष शाखा २ येथील पोलीस अधिकारी व अमंलदार आणि सर्व पोलीस ठाण्यांचे पासपोर्ट पडताळणी करणारे पोलीस अमंलदार उपस्थित होते.
या प्रशिक्षण सत्रामध्ये पासपोर्ट पडताळणीची प्रकिया अलीकडील तांत्रिक सुधारणा आणि अचूक व वेळेत पोलीस पडताळणी अहवाल सादर करणसाठी आवश्यक सर्वोत्तम पध्दतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पासपोर्ट प्राधिकरण आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट सेवा अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारीत करण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ''वेळेत आणि अचूक पोलीस पडताळणी ही पासपोर्ट वितरण प्रक्रियेचा अत्यंत महत्वाचा भाग असुन ती राष्ट्रीय सुरक्षेसोबतच नागरीकांच्या सोयीसाठीही आवश्यक आहे.'' असे त्यांनी सांगितले.
पासपोर्ट उप अधिकारी श्रुती पांडे यांनी 'पासपोर्ट सेवा कार्यक्रम (PSP) आवृती २.० विषयी' सविस्तर माहिती दिली. या नव्या प्रणालीमुळे डिजीटल सुविधा वाढल्या असून पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ वेगवान आणि पारदर्शक झाली आहे. तसेच पोलीस यंत्रणेशी अधिक चांगला समन्वय साधला जात आहे, असे पांडे यांनी सांगितले. शेवटी प्रश्नोत्तरे झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना व शंकांना पासपोर्ट अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.