पिंपळे निलख | 12 सप्टेंबर 2026 : कंपनीचे बँक व्यवहार करण्यासाठी विश्वासाने दिलेल्या पासवर्डचा गैरवापर करून तब्बल 5 कोटी 67 लाख 6 हजार 592 रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळविल्याचा प्रकार समोर आला आहे. या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार 4 जानेवारी 2025 पासून सिटी ॲग्रो कंपनीच्या कार्यालयात सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुकेश कुमार बासिष्ठ नारायण साह (वय 46) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कंपनीतील बँक व्यवहारांसाठी आरोपीला विश्वासाने पासवर्ड देण्यात आला होता. त्याचा गैरवापर करून कंपनीच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे.
गैरव्यवहार लपविण्यासाठी कंपनीच्या द फेडरल बँकेतील खात्याचे स्टेटमेंट बनावट करून ते खरे असल्याचे भासविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. अमित दिलीप परदेशी (वय 38) याच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 533/2026 नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.