बालगंधर्व रंगमंदिरात २१ व २२ फेब्रुवारीला रंगणार प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन
पिंपरी, ता. १९ - पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन येत्या शनिवारी (ता. २१) व रविवारी (ता. २२) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केले आहे. तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत संमेलनाच्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. अशी माहिती 'यशदा'चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना गायकवाड यांनी सांगितले की, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. शनिवारी सकाळी १०:३० वाजता महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होईल. निरंजनकुमार सुधांशू संमेलनाचे मुख्य संयोजक असून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार सहसंयोजक आहेत.
उद्घाटनानंतर दुपारी शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य लेखनातील आव्हाने या विषयावर परिसंवादात माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, आनंद पाटील, सुशील गायकवाड यांचा सहभाग असणार आहे. अधिकाऱ्यांच्या अनुभव कथनात महेश भागवत, राजेश पाटील, ज्ञानेश्वर मुळे, विजय कुलांगे, कपिल शिरसाट, प्रतीक ठुबे, सुरेंद्रकुमार मानकोसकर सहभागी होतील. त्यानंतर शेखर गायकवाड यांच्याशी राजीव नंदकर संवाद साधणार आहेत. त्यानंतर माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संवाद कार्यक्रम होईल.
रविवारी सकाळी 'स्पर्धा परीक्षा संधी, समस्या व आव्हाने' या विषयावर बिरदेव डोणे, सोनल सोनकवडे, शुभम पाटील, सोनल सूर्यवंशी, प्रसाद चौघुले बोलणार आहेत. त्यानंतर 'माझे वाचन आणि लेखन' या विषयावर विकास खारगे मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला 'यशदा'चे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या सचिव आशा उबाळे उपस्थित होते.