बावधनमध्ये उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; दोन तरुणांचा मृत्यू

बावधनमध्ये उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; दोन तरुणांचा मृत्यू

बावधन | १० नोव्हेंबर २०२६ : पुण्यातील बावधन परिसरात मुंबई-बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रकचालकाने रस्त्यावर ट्रक उभा करताना पार्किंग लाइट लावले नव्हते. तसेच वाहन उभे असल्याची इतर वाहनचालकांना जाणीव होण्यासाठी कोणतीही सुरक्षाव्यवस्था केली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी फुलचंद बळीराम गडदे (वय २२ वर्षे, राहणार गडदेवाडी, ता. परळी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात नदीम अहमद (वय २७ वर्षे, राहणार तिसुरा, पो. मंगोली, जि. अमेठी, उत्तर प्रदेश) या ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास चांदणी चौकाजवळ मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या सातारा लेनवर घडली.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी चालकाने एमएच ४६ एएफ ५०२७ क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला होता. मात्र, ट्रक उभा करताना त्याने कोणत्याही प्रकारची पार्किंग लाइट लावली नव्हती. तसेच इतर वाहनचालकांना धोका होऊ नये यासाठी कोणतीही खबरदारी घेतली नव्हती.

दरम्यान, फिर्यादीचा भाऊ सुखदेव बळीराम गडदे (वय २६ वर्षे) आणि त्याचा मित्र कैलास शिवाजी माने (वय २० वर्षे) हे दोघे एमएच ४४ एबी ६४९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून नंदी साखर कारखाना, चिकुर्डी, कर्नाटक या ठिकाणी जात होते.

त्यावेळी त्यांच्या दुचाकीची रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठीमागील भागाला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तसेच सुखदेव गडदे आणि कैलास माने हे दोघेही गंभीर जखमी झाले.

या अपघातात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ट्रकचालकाने रस्त्याच्या मधोमध ट्रक उभा करून आवश्यक सुरक्षेची खबरदारी न घेतल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच अपघातानंतर जखमींना कोणतीही मदत न करता आणि अपघाताची माहिती न देता चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८५, १०६(१) आणि ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १११/१७७ आणि १३२(१)(क) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बावधन पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories