बावधन | १० नोव्हेंबर २०२६ : पुण्यातील बावधन परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका २० वर्षीय तरुणावर दोघांनी दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. तसेच स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळून जाणाऱ्या तरुणाला पुन्हा पकडून त्याचे दोन्ही हात दगडाने ठेचल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत तरुणाचा समोरील एक दात पडला असून, बावधन पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गणेश पोपट अडागळे (वय २० वर्षे, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे; मूळगाव जानेगाव, ता. केज, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात अथर्व ढोणे आणि अमोल काळे (दोघेही राहणार बावधन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास बावधन येथील सूर्योदय कॉलेजसमोरील मोकळ्या जागेत घडली.
फिर्यादी गणेश अडागळे आणि आरोपी अथर्व ठाणे व अमोल काळे हे तिघेही त्या ठिकाणी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला वीट आणि दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. तसेच मारहाणीदरम्यान फिर्यादीच्या दोन्ही हातांची बोटे दगडाने ठेचण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी फिर्यादी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, मेन रोडवरील फुटपाथवर आरोपींनी त्यांना पुन्हा गाठले.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे डोके फुटपाथवर आपटून त्यांना गंभीर दुखापत केली. या मारहाणीत फिर्यादीचा समोरील एक दात पडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर गणेश अडागळे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.