काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांना अटक

काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांना अटक

काळेवाडी | १० नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात दिवाळीनिमित्त मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणावर जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या मानेवर आणि उजव्या कानाजवळ कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपी अटकेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सार्थक दीपक रेड्डी (रहाटणी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात तुषार वाल्मिकी (वय २० वर्षे), रेहान कुरणे (वय २१ वर्षे) आणि दिलशाद आलम (वय २१ वर्षे, सर्व राहणार काळेवाडी, पुणे) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काळेवाडीतील भारतमाता चौक परिसरातील अभिनी कॉलनी येथे घडली.

फिर्यादी सार्थक रेड्डी आणि त्यांचे मित्र आदेश ऊर्फ आदित्य गणगोपाळ व रामजी ऊर्फ भागवत दणकट हे दिवाळीनिमित्त भेटण्यासाठी भारतमाता चौक परिसरात गेले होते. त्यावेळी फिर्यादीचा मित्र गप्पा मारत असताना आरोपी तिघे मोटारसायकलवरून आरडाओरडा करत त्या ठिकाणी आले.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  फिर्यादीने आरोपीकडे पहिले म्हणून आरोपींनी फिर्यादीकडे पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपी तुषार वाल्मिकी याने फिर्यादीला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले.

त्यानंतर आरोपी तुषार मोटारसायकलवरून उतरून फिर्यादीजवळ आला आणि त्यांचा मोबाईल मागू लागला. मात्र, फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार दिल्याने आरोपीने शिवीगाळ करत तिघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी फिर्यादीचा मित्र भागवत याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी तुषारने त्यालाही या वादाशी संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने आपल्या शर्टच्या आतून कोयता बाहेर काढून फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केल्याचा आरोप आहे.

फिर्यादीने पहिला वार चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर झालेल्या वारामुळे फिर्यादीच्या मानेवर आणि उजव्या कानाजवळ गंभीर दुखापत झाली.

या घटनेदरम्यान फिर्यादीने स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. आरोपीने हातातील कोयता हवेत फिरवत कोणीही मध्ये येऊ नये, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

आरोपींच्या या कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि जमलेले नागरिक तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) यांसह शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४(२५)(२७), महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१)(३)/१३५ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टमधील कलम ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिन्ही आरोपी अटकेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories