बावधनमध्ये पत्नीच्या प्रियकराकडून पतीला मारहाण; तिघांवर गुन्हा

बावधनमध्ये पत्नीच्या प्रियकराकडून पतीला मारहाण; तिघांवर गुन्हा

बावधन | १० नोव्हेंबर २०२६ : पुण्यातील बावधन परिसरात पती-पत्नीमधील वादानंतर पत्नीचा प्रियकर दोन साथीदारांसह पतीच्या घरासमोर पोहोचल्याची घटना समोर आली आहे. पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचारत प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता लोखंडी सळईने वार करून त्याला जखमी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बाळू हिंमत गवई (वय २६ वर्षे, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे; मूळगाव जानेगाव, ता. केज, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात विठ्ठल वांडकर (राहणार सुसगाव) आणि त्याचे दोन साथीदार अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास सुसगाव येथील पारखेवस्ती परिसरात, गणपती मंदिराजवळील करण चांदरे यांच्या बिल्डिंगसमोर घडली.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा आणि पत्नी आम्रपाली यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर काही वेळाने पत्नी आम्रपाली हिने तिचा प्रियकर विठ्ठल वांडकर आणि त्याच्या दोन साथीदारांना फिर्यादीच्या घरासमोर आणल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यावेळी विठ्ठल वांडकर आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला 'तू आम्रपाली हिला का मारले?' असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मारहाण सुरू असतानाच आरोपी विठ्ठल वांडकर याने घटनास्थळी पडलेली लोखंडी सळई उचलून फिर्यादीवर वार केला. हा वार चुकविण्यासाठी फिर्यादीने खाली वाकून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोखंडी सळईचा वार त्यांच्या उजव्या कानाच्या बाजूला लागला. त्यामुळे ते जखमी झाले.

या मारहाणीनंतरही आरोपींनी फिर्यादीला धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. 'आम्रपालीला मारले तर तुला पाहून घेईन', अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.

या घटनेनंतर बाळू गवई यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बावधन पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories